सौर ऊर्जेशिवाय तरणोपाय नाही
भारतात प्रामुख्याने कोळसा जाळून वीज तयार केली जाते. असा क्रम असाच सुरू राहिला तर एक ना एक दिवस या पृथ्वीच्या पोटातील कोळशाच्या साठ्यांना मुकावे लागणार आहे. म्हणजे औष्णिक वीज निर्मितीला मर्यादा आहेत. तीच अवस्था जलविद्युत निर्मितीची आहे , असे म्हणावे लागेल. देशात जलविद्युत निर्मितीसाठी आवश्यक अशा जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या प्रकल्पलाही मर्यादा आल्याच.बाकीच्या गैरपरंपरागत वीज निर्मितीच्या साधनांमध्ये सौर ऊर्जा हाच एक मार्ग असा आहे की, ज्याच्या साधनाला कसल्याही मर्यादा नाहीत. देशात अन्य देशांच्या तुलनेत ऊन भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजे ऊन्हाला आपल्या देशात तोटा नाही , असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे.
सूर्य लाखो वर्षांपासून आग ओकतो आहे. यापुढेही लाखो वर्षे आग ओकत राहील. त्यामुळे या ऊर्जा साधनाचा पुरेपूर वापर करण्याचे ठरविले तर पुढे शेकडो वर्षे देशाला वीज कमी पडायची नाही. वीज टंचाई जाणवणार नाही. सौर ऊर्जा जोखीमविरहीत आहे. अणु ऊर्जा जोखमीची आहे. औष्णिक ऊर्जा प्रदुषणकारी आहे. असा कोणताही तोटा, नुकसान करण्याचा प्रकार या सौर ऊर्जेने होणार नाही. अलिकडच्या काळात सरकारने याचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात वेगाने पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब चांगलीच म्हटली पाहिजे. उशिराने सुचलेले शहानपण वाया जात नाही.
भारताला जगातील अन्य देशाच्या तुलनेत सूर्य प्रकाश प्रचंड प्रमाणात मिळत आहे. तरीही आपण त्याचा वापर करण्याचा अट्टाहास धरला नाही. त्यादृष्टीने संशोधन पुढे सरकले नाही. अर्थात राज्यकर्त्यांनी काळाची पावले ओळखण्यात चूक केली. अन्य प्रगत देशांनी मात्र पुरेसा सूर्य प्रकाश उपलब्ध नसतानाही या क्षेत्रात कमालीची प्रगती केली आहे. आपल्याजवळ मुबलक असूनही त्याचा वापर करता आला नाही. जिथं पिकतं , तिथं त्याची किंमत कळत नाही, हेच खरं ! अन्य देशात सौरशक्तिकेंद्र उभारून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरीत करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
सध्या प्रत्येक राष्ट्राची विजेची गरज ही फारच वाढली आहे. आणि इतर ऊर्जा पदार्थांची मुबलकता कमी झाली आहे. त्यामुळे सौर ऊर्जेच्या पर्यायावर सर्व राष्ट्रांचा भर आहे. सौरऊर्जेच्या उपयोगाची आधुनिक उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. पेटीचा कुकर, सौरभट्टी, पाणी गरम करण्याचा प्लॅट, प्लेट कलेक्टर, गरम हवेचा कलेक्टर, शेतीचे पदार्थ वाळविण्यासाठी ड्नयर, खाऱ्यापाण्यापासून गोडेपाणी करणारा सोलर स्टील, उबदार राहणारे सौर घट, हिट पंप अशा अनेक प्रकारची सौर ऊर्जा उपकरणे विकसित झाली आहेत.
परदेशामध्ये पॉवर प्लॅट, सूर्य विजेवर चालणारे फ्रिज, सूर्यवीज केंद्रे इत्यादी वापरात आले आहेत. भारतामध्ये सुध्दा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सूर्यशक्तिचे प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू आहेत. भोर-नाशिक भागातील रस्त्यावरील दिवे सूर्य विजेवर चालतात. धुळे जिल्ह्यात ३२० एम. डब्ल्यू. सूर्य वीज प्रकल्प १९८५ मध्ये सुरू झाला आहे. सद्या याच जिल्ह्यात १५० मेगावॅत क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. चंद्रपूरलाही मोठा प्रकल्प होत आहे. तामीळनाडूत सूर्यविजेवर रेल्वे सिग्नल, तिरूपती-बंगळूर-विशाखापट्टणम येथे इंटरलॉक पध्दती, ग्रामीण पंपासाठी, सूर्य विजेचा वापर दिल्लीजवळ मसुदपूर खेड्यात प्रत्येक घरात स्वयंपाक, दिवे, पाण्याचे पंप, टी. व्ही. रेडिओ हे सर्व सूर्यविजेवर चालतात. अपंगाच्या सायकलीसाठी सूर्य ऊर्जा वापरली जाते.
सध्याच्या विज्ञानयुगात प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणारीवीज अंतराळात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तिचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका मोहिमेसाठी उपग्रहाच्या रिमोट कंट्रोलसाठी, रडार यंत्रणा इत्यादी ठिकाणी सूर्य विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सौर ऊर्जा महाग वाटत असली तरी अंतिमतः स्वस्त पडते. १९९० च्या दशकामध्ये अनु, जल, आणि औष्णिक या विद्युत निर्मितीच्या प्रकारांचा उत्पादन खर्च सौर ऊर्जेपेक्षा फारच कमी होता. सौर ऊर्जा त्यामानने खूपच महाग होती. त्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प फारसे वाढले नाहीत. पण आता परिस्थिती उलटी आहे. अंतिम दृष्ट्या पाहिले तर सौर ऊर्जा स्वस्त पडते. कारण या प्रकल्पाचा राखरखवाचा खर्च फार कमी आहे. कुठले प्रदूषण होत नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणावर होणारा अन्य खर्च टळतात. प्रदूषण होणे हासुद्धा अपव्यय आहे. असा विचार केला तर सौर ऊर्जा प्रकल्प स्वस्तच पडतात. त्यामुळे दूरगामी विचार करून या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.