सूर्यचुलीत कोणकोणते पदार्थ तयार करता येतात?
> भाकरी आणि चपाती सोडून सूर्यचुलीत अगदी सगळे पदार्थ करता येतात. कारण भाकरी-चपातीसाठी सुमारे ३२५ ते ३५० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. मात्र, सध्याच्या स्थितीत सूर्यचुलीत मिळणारे तापमान हे १३० ते १३५ अंश सेल्सिअसपर्यंत असतं. त्यामुळे चपाती, भाकरी भाजणं अशक्य होतं. सूर्यचुलीत मिळणा-या कमीत कमी तापमानामुळे पदार्थ हळुवारपणं शिजतो. त्यामुळे तो चविष्ट बनतो. परिणामी पदार्थातील जीवनसत्त्वांची हानी होत नाही. डाळ, भात, अंडं हे पदार्थ त्यात उत्तमरीत्या शिजतात. पदार्थाचा मऊ किंवा कठीणपणा त्याचा विचार करता एक ते दीड तासात अन्न शिजतं. थंडीत मात्र पदार्थ शिजताना काहीसा अधिक वेळ लागू शकतो. दुपार आणि संध्याकाळच्या जेवणात काय केलं जाणार आहे, याची कल्पना गृहिणींना असते.
या सूर्यचुलीत सगळय़ा प्रकारची कडधान्यंही शिजतात, हे विशेष. विदर्भात मोठय़ा प्रमाणात सूर्यप्रकाश आहे, अशा ठिकाणी काबुली चणेही दोन तासात शिजतात. म्हणजे इतर अन्नही याच कालावधीत शिजू शकतं, हे निश्चित. सूर्यचूल ही हातातील ब्रीफकेससारखी (पेटीसारखी) असते. त्यामुळे शहरात ही सूर्यचूल गच्चीवर तर ग्रामीण भागात, अंगणात जिथे पुरेसा सूर्यप्रकाश असतो तिथे ठेवावी. सकाळी नऊ ते दुपारी दोन ही वेळ पदार्थ शिजवण्यासाठी उत्तम असते. दोन वाजल्यानंतर तापमान कमी होऊ लागतं. त्यामुळे वरील कालावधीत सूर्यचूल सोयीनुसार गच्ची अथवा अंगणात जिथे सूर्यप्रकाश असेल त्या ठिकाणी ठेवावी. अनुभवानं अन्न शिजण्याचा अंदाज निश्चित कळतो.
सूर्यचुलीमुळे घरातील ५० टक्के इंधनाची बचत होऊ शकते. डाळ, भात, भाज्या, कडधान्यं उत्तम शिजतात. तसंच रवा, बेसन, शेंगदाणेदेखील चांगल्या प्रकारे भाजता येतात.
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ उत्तमरीत्या शिजतात. मांसाहारी पदार्थासाठी थोडा जास्त वेळ लागतो. सद्यपरिस्थितीत सर्वाधिक खर्च हा स्वयंपाकाच्या इंधनावर होत असतो. अशा वेळी ५० टक्के इंधनाची बचत होणं, म्हणजे पैसे वाचवणं त्याचबरोबरच राष्ट्रीय संपत्तीचा -हास आणि प्रदूषणाला आळा घालणं होय.
No comments:
Post a Comment